संगमनेर:
राजकीय स्वार्थापोटी काँग्रेस पक्ष ज्यांनी गहाण टाकला तेच दुसऱ्यांना निष्ठेच्या गोष्टी शिकवतात राज्याचे नेतृत्व करणाऱ्यांना जिल्ह्यात एकही जागा काँग्रेस पक्षासाठी मिळवता आली नाही. लोकशाही आणि संविधान धोक्यात आणल्याचा भाजपवर आरोप करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचेच राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे.येणार्या विधानसभा निवडणुकीत गरीब उमेदवार शोधा मग याची प्रतिक्रीया बघू आशा शब्दात महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांवर निशाणा साधला.

महासंकल्प विजय मेळाव्याच्या निमित्ताने संगमनेरात आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या मेळाव्यात मंत्री विखे पाटील बोलत होते. राज्याचे बंदरविकास मंत्री ना.दादा भूसे, उद्योगमंत्री उदय सामंत , खा.सदाशिव लोखंडे, माजी आ.भाऊसाहेब कांबळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपील पवार, शिवसेनेचे कमलाकर कोते, भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्ष कांचनताई मांढरे, यांच्यासह सर्व पक्षांचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. जिल्ह्यातील महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयी आपल्याला विजयी करायचे आहेत. असे स्पष्ट करुन मागील दहा वर्षात या देशाला मोदीजींच्या नेतृत्वामुळे आर्थिक स्थैर्य मिळाले. सामान्य माणूस विकासाच्या मुख्य प्रवाहात आला. या देशाला समर्थ आणि विकसीत राष्ट्र बनविण्यासाठी मोदीजींचे सुरु असलेले अवितर कष्ट सुरु आहेत.
लोककल्याणकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात मिळत असल्याने मागील दहा वर्षात केंद्र सरकावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप होवू शकला नाही. महिलांचा सन्मान हेच मोदी सरकारचे धोरण असून, नारी शक्तीला बळ देण्याचे काम केंद्र सरकारकडून होत आहे. मोफत धान्य योजनेपासून ते आयुष्यमान भारत योजनेपर्यंतचा लाभ देशातील कोट्यावधी लोकांना होत आहे. इस्त्रोने यशस्वी केलेली चांद्रयान मोहिम आणि अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांची मंदीर निर्मिती ही देशाला महासत्तेच्या दिशेने नेणारी असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराच्या विरोधात संघर्ष करीत आहे. मात्र इंडीया आघाडी केजरीवालांसारख्या भ्रष्टाचारी व्यक्तीचे समर्थन करत आहे. या आघाडीकडे कोणतेही नेतृत्व नाही. अजेंडा नाही. राज्यातील महाविकास आघाडीचीसूद्धा फार काही वेगळी परिस्थिती नाही. केवळ व्यक्तीद्वेषापोटी प्रधानमंत्र्यांवर टीका करायची. संविधान आणि लोकशाही धोक्यात आल्याचा आरडा ओराडा करायचा. पण असा आरोप करणाऱ्यांचे राजकीय अस्तित्वच धोक्यात आल्याने त्यांना राजकारणाची चिंता अधिक आहे.
निष्ठेच्या गोष्टी करणाऱ्यांनीच पदवीधर निवडणूकीत काँग्रेस पक्ष गहाण टाकला आणि तेच आता दुसऱ्याला निष्ठेच्या गोष्टी शिकवतात. तुमचा पक्षनिष्ठेचा इतिहास काढायला लावू नका. पुढच्या संगमनेर विधानसभेच्या निवडणूकीत गरीब उमेदवार उभा राहिला तर ती निवडणूक कोणाविरुद्ध असेल असा खोचक सवालही मंत्री विखे पाटील यांनी केला.
मंत्री दादा भूसे म्हणाले की, मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी शिर्डी लोकसभा मतदार संघातून लोखंडेंना पुन्हा विजयी करायचे आहे. केंद्र सरकारच्या किसान सन्मान योजनेबरोबरच राज्य सरकारनेही शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची योजना सुरु केली असून महिलांना बस प्रवासात ५० टक्के सुट दिली असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री उदय सामंत म्हणाले की, राज्यात ३५ हजार उद्योजक निर्माण करण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. जिल्ह्यातही तीन औद्योगिक वसाहतींना जागा देण्याचे काम पालकमंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून झाले असून, आगामी निवडणूकीत केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.
राज्य सरकारने दुध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याची योजना सुरु केली. जिल्ह्यातील ६७ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ५६ कोटी रुपये वर्ग झाले असून, संगमनेर तालुक्यात १२ कोटी २५ लाख रुपयांचे अनुदान मिळाले असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ सुमारे ८ लाख लोकांना मिळाला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.