नगर:
“तुला बघतोच यंदा कसा निवडून येतो ते” असा केवळ जाहीर इशाराच नव्हे तर इशारा दिलेल्या नेत्याला पराभवाचा 330 हॉल्टचा झटका देणार्या अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस साठी येणाऱ्या पारनेर विधानसभेसाठीची जागा “व्हॅकंट” झालेली आहे. निलेश लंके यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल होत लोकसभा निवडणुकीची उमेदवारी पदरात पाडून घेतली. यासाठी त्यांनी मुदतीपूर्वीच आपल्या आमदार पदाचा राजीनामा थेट विधानसभा अध्यक्षांकडे पाठवून अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी काडीमोड घेतला. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकीकडे बारामती लोकसभा मतदारसंघात अजितदादांनी सुमित्रा पवार यांना उतरवले असताना या प्रतिष्ठेच्या लढाईत त्यांच्या वाटेवर विजय शिवतारे यांनी काटे अंथरवून ठेवले होते,मात्र अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने हे काटे साफ केले. महायुतीत कमी जागा राष्ट्रवादी काँग्रेस कडे आहेत. त्यामुळे अजित पवारांना आपला दबदबा कायम दाखवण्याची किमया करावी लागणार आहे. या सर्व तानातानीत अजितदादा काहिसे नक्कीच तापलेले असतील. अशात पारनेरचे अजितदादांचे निकट समजले जाणारे आणि सोबत आल्याने शेकडो कोटींचा निधी पदरात पाडून घेतलेले निलेश लंके यांनी लोकसभा निवडणूक लढवायचीच या आकांक्षेने अजितदादांची साथ ऐनवेळी सोडली. यावर अजितदादांची आलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. पारनेर वगळता निलेश लंके इतर मतदारसंघात तेव्हढे लोकप्रिय नाही हे त्यांनी स्पष्टच सांगितले. कोणीतरी निलेश लंकेंच्या डोक्यात हवा भरली असेही ते म्हणाले. निलेश लंके यांना खूप चांगले भविष्य आहे त्यामुळे त्यांनी असला काही निर्णय घेऊ नये असे अजितदादां म्हणाले होते. मात्र एव्हढे आर्जव अजित पवारांसारख्या डॅशिंग आणि मातब्बर नेत्याने करूनही निलेश लंके यांनी अजित पवारांची साथ सोडली आणि तीही ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि अजितदादां काहिसे अडचणीत असताना. आता निलेश लंके शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत. तर समोर महायुती मधील भाजपचे डॉ सुजय विखे यांचे कडवे आव्हान समोर आहे. या परिस्थितीत अजित पवारांना केवळ युतीधर्म म्हणून नव्हे तर आपल्या सोबतचा ज्यांच्यावर विश्वास टाकून शेकडो कोटींचा निधी दिला ते निलेश लंके ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोडून गेल्याची मोठी सल असणार आहे. अजित पवारांना एक डॅशिंग आणि सडेतोड बोलणारा नेता म्हणून अवघा महाराष्ट्र ओळखतो. ज्याच्याशी पटले त्यांच्यावर ते जीव ओवाळून टाकतात, मात्र काही बिनसले असेल तर खरपूस समाचार घेतानाच सगळे उट्टे काढत हात धुवून मागे लागतात. 2019 ला पुरंदर मध्ये विजय शिवतारे यांचा पराभव अजित पवारांनी जाहीर भाषणात आव्हान देऊन करून दाखवला. त्यावेळी त्यांच्या भाषणातले “तू यंदा कसा निवडून येतो,बघतोच ते!!” असे जाहीर वक्तव्य केले आणि खरेही करून दाखवले. “लै पोपटा सारखा बोलतोय” असा मार्मिक अजितदादा स्टाईल टोला त्यांनी लगावला होता. सध्या बदलत्या परस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन अजित पवार आणि शरद पवार गटात झालेले आहे. दोन्हीही पक्ष एकमेकांवर टीकाटिप्पणी करण्याची एकही संधी सोडत नाही, हाडवैर असल्याप्रमाणे दोन्ही पक्षातून आता विस्तवही जाणार नाही अशी राजकीय परिस्थिती बनलेली आहे. बारामती मतदारसंघात खा.सुप्रिया सुळे आणि सुमित्रा पवार यांच्यातील लढत केवळ राजकीय न राहता त्याला कौटुंबिक पदर जोडले जात आहे. एकूणच या परिस्थितीत निलेश लंके यांनी अजित पवारांची साथ सोडत शरद पवारांची साथ करत लोकसभा निवडणुकी लढवण्याचा निर्णय घेतल्याने कुठेतरी अजित पवार किती नाराज असू शकतात याचा अंदाज सर्वांनाच असणार आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली लोकसभा आणि त्यानंतर काही महिन्यातच होणारी विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात अजित पवार जातीने लक्ष घालणार यात शंका नाही. 2019 ला एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल 6 आमदार निवडुन आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतर सहापैकी चार आमदार अजित पवारांसोबत महायुती मध्ये गेले. मात्र निलेश लंके यांनी राजीनामा देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याने हे बलाबल आता 3-2 असे झाले आहे. त्यामुळे विधानसभेला पारनेर मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत “व्हॅकंट” जागेवर अनेकांचा डोळा असणार आहे. जागा वाटपात पारनेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार हे उघड आहे. आणि असणाऱ्या उमेदवाराला निवडणून आणण्यासाठी अजित पवार जातीने लक्ष घालून निवडणूक प्रतिष्ठेची करणार आहे. या परिस्थितीत पारनेरची लढाई दुभंगलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील दोन्ही गटाच्या उमेदवारातच होणार अशीच दाट शक्यता असल्याने लक्षवेधी ठरणाऱ्या या लढतीत अजित पवार पारनेर मधून कुणाला संधी देणार हे ही महत्वाचे असल्याने पारनेरच्या सध्या “व्हॅकंट” जागेवर अनेकांचा डोळा असणार हे निश्चित!!
पारनेरच्या अजितदादांच्या राष्ट्रवादीतील “व्हॅकंट” जागेवर अनेकांचा डोळा!!
- Advertisement -