नगर:
गेल्या वर्षी झालेली नाशिक पदवीधर विधान परिषदेची निवडणूक राज्यात गाजली ती काँग्रेस पक्षांतर्गत सुंदोपसुंदी, एबी फॉर्मचा घोळ आणि त्यानंतर सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारी मुळे. मुळात नाशिक पदवीधरवर डॉ सुधीर तांबे यांनी सलग तीन टर्म(2009,2011,2017) निवडणुकांत एकहाती वर्चस्व ठेवत जागा काँग्रेसच्या ताब्यात ठेवली. या सर्व प्रक्रियेत आ.बाळासाहेब थोरात यांची भूमिका महत्त्वाचीच होती. मात्र 2022ला थोरात-तांबे कृटुंबाने डॉ सुधीर तांबे यांच्या ऐवजी सत्यजित तांबे यांना निवडणुकीत काँग्रेस कडून उतरवण्याचे ठरवले होते. दुसरीकडे काँग्रेस पक्षातील राज्यातील महत्वाच्या नेत्यांत याबाबत उमेदवारीवरून मोठा घोळ पहावयास मिळाला. दिल्लीतून एक एबी फॉर्म डॉ सुधीर तांबे यांच्या नावाचा तर एक कोरा एबी फॉर्म पाठवण्यात आल्याचे एकीकडे सांगण्यात आले असले तरी सत्यजित तांबे यांच्या एबी फॉर्म बाबत गूढ कायम राहिले. यात आ.बाळासाहेब थोरातांची संबंधित नेत्यांबद्दलची नाराजी लपून राहिली नाही. सत्यजित तांबेंनी आपला अपक्ष अर्ज दाखल करतानाच सर्वच पक्षांकडे जाहीर पाठिंबा देण्याची विनंती केली. महायुती कडून शिवसेनेच्या शुभांगी पाटील या उमेदवार होत्या. त्यांनी बाळासाहेब थोरात यांचा पाठिंबा अपेक्षित होता, त्यासाठी त्यांनी थेट संगमनेर मधील थोरातांचे निवासस्था गाठले. मात्र या दरम्यान बाळासाहेब थोरात हे नागपूर अधिवेशनात तोल जाऊन पडल्याने त्यांच्या हातावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असल्याने शुभांगी पाटील यांना थोरातांच्या निवासस्थानी साधा प्रवेशही मिळाला नाही. त्यामुळे थोरातांची नाराजी अधीकच स्पष्ट झाली. थोरातांनी उमेदवारी बाबत राज्यातील काँग्रेस नेत्यांनी घातलेल्या घोळा बाबतची नाराजी आणि तक्रार थेट दिल्ली दरबारी केली. या परीस्थित सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून मदतीच्या विनंतीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साद दिली असेच म्हणावे लागेल. भाजप मधून हक्काच्या मतदारांना सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचे फर्मान असो वा देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांच्या पुस्तक प्रकाशनच्या निमित्ताने केलेले सूचक वक्तव्य असो हे सर्व पाहता सत्यजित तांबे यांच्या विजयात फडणवीस यांचा आणि पर्यायाने भाजपचा मोठा वाटा राहिल्याचे स्पष्ट झाले. या दरम्यान अपक्ष म्हणून निवडून आलेले सत्यजित तांबे विधान परिषदेत कुणाला साथ देणार याचीही मोठी चर्चा झाली. आता हीच चर्चा पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा सुरू झाल्याचे दिसून येत असून नाशिक पदवीधर मतदारसंघात विशेष करून नगर जिल्ह्यातील नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा निवडणुकीत अटीतटीची लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत दिसून येत असताना आ.सत्यजित तांबे नगर जिल्ह्यातील या दोन्ही मतदारसंघात काय भूमिका घेणार या कडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजपने दिलेल्या पाठबळावर सत्यजित तांबे यांचा विजय अगदी सुकर झाला. काँग्रेस पक्षातील नेत्यांनी निवडणुकी दरम्यान घेतलेली भूमिका पाहता अपक्ष आमदार असल्याने सत्यजित तांबे यांच्यावर कुणाला पाठिंबा द्यावा किंवा कुणाला मदत करावी यासाठी तसे कुठलेही बंधन नाही. त्यामुळे भाजपने विधान परिषद निवडणुकीत केलेल्या मदतीची परतफेड आ.सत्यजित तांबे जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात करणार का? की जेष्ठनेते आ.बाळासाहेब थोरात यांच्या अनुकूलतेवर ते महाविकास आघाडीच्या उमेदवारांसोबत राहणार यावर जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.
“पदवीधर”ला भाजपची मदत मिळालेले आ.सत्यजित तांबे लोकसभेला काय भूमिका घेणार??
- Advertisement -