नगर:
पूर्वी निवडणूक काळात सार्वजनिक ठिकाणी असलेल्या भिंतीं रंगवून उमेदवारांचा प्रचार ही सर्रास बाब असायची. उमेदवाराचे उर्फ नावासह कागदोपत्री असलेले पूर्ण नाव, अनुक्रमांक, पक्षाचे नाव आणि चिन्ह यासह “अमुक-तमुक.. चिन्हावर रबरी फुलीचा शिक्का मारून प्रचंड मतांनी विजयी करा” असा उल्लेख असायचा. पांढरा रंगाच्या चौकटीत निळ्या रंगाने या भिंतीवरील जाहिराती निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याच्या पदोपदी नागरिकांना आठवण करून द्यायच्या. यानिमित्ताने पेंटर लोकांना मोठा रोजगार मिळून जायचा. शहरापासून ते खेडेगाव, बसस्टॉप, सार्वजनिक-खाजगी जागांवर या जाहिराती मतदारांना आकर्षित करायच्या. वास्तविक अशा पद्धतीने भिंती रंगवून जाहिरात करण्यास परवानगी घेणे हा विषय गौण दिसून येत असला तरी यात सर्व राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार जास्तीजास्त प्रमाणात भिंती वरील जाहिराती या निवडणुकीचा अविभाज्य भाग समजत असे.
दरम्यान टी एन शेषन केंद्रीय निवडणूक आयुक्त झाल्यानंतर त्यांनी अनेक अवैध प्रकारांना शिक्षेचा आणि थेट उमेदवारीवर कारवाईचा बडगा उगारून आळा घातला. जाहिरातींना प्रतिबंध केला. टीएन शेषन यांच्या कडक शिस्तीत आणि नियमावर बोट ठेवून कारवाईच्या भीतीने निवडणुकीतील अनेक गैरप्रकार थांबतानाच आदर्श आचारसंहिता लागू झाली. आता जुने परंपरागत प्रकार बंद झाले असले तरी काळ बदलतो तसे नवीन तंत्र येते आणि समाजजीवनात या नवीन तंत्रांचा वापर “यत्र तत्र सर्वत्र..” उक्ती प्रमाणे सुरू होतो, तसा तो आता निवडणुकीच्या प्रचारातही दिसून येऊ लागला आहे. एलईडी स्क्रीन हे त्याचेच एक उदाहरण. आणि व्हाट्सएप, फेसबुक आदी समाजमाध्यमे तर सध्या उदंड झाली असून याद्वारे आपल्या पसंतीच्या उमेदवाराचे समर्थन मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे.
याचाच प्रत्येय नगर दक्षिण मतदारसंघात आता दिसून येत असून सुजय विखेंच्या समर्थनार्थ “पुन्हा एकदा सुजय पर्व” “कहो दिलसे सुजयदादा फिरसे” तर निलेश लंके यांच्या समर्थनार्थ “मी लंके साहेबां सोबत” अशा पोस्ट व्हायरल केल्या जात आहे. या पोस्टवर समर्थक आणि विरोधक परस्परांशी भिडताना दिसून येतात. अनेकदा यातून खालच्या पातळीवर असंसदीय शब्द, बोचरी टीका, आरोप-प्रत्यारोप दिसून येतात. यातून सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता असू शकते. निवडणूक आयोगाने समाज माध्यमातून प्रदर्शित होणाऱ्या पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत केल्याचे घोषित केले असले तरी प्रत्येक्षात ही यंत्रणा किती बारकाईने लक्ष ठेवते हा एक प्रश्न आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात समाज माध्यमांवर लक्ष ठेवणे मोठे आव्हान आहे. मात्र कायदा सुव्यवस्था आणि आदर्श आचारसंहितेचे पालन होण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत. चुकीचे काही केले तर निश्चितच कारवाईला संबंधितांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या उमेदवाराला पाठिंब्याची पोस्ट करताना नियम आणि बंधने याचा विचार संबंधितांनी केलाच पाहिजे एव्हढे निश्चित.