नगर:
मी रोज सात किलोमीटर चालतो, मी पैलवान गडी आहे असे सांगत आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघा साठी एकदम फिट उमेदवार असल्याचा दावा शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डीत पत्रकार परिषदेत केला होता. त्यावर आता लोखंडे यांना महायुतीमधूनच उपरोधिक टिप्पणीला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे.
खासदार लोखंडेंनी आपल्या रोज सात किलोमीटर चालण्याचा आणि आपल्या पैलवानकीचा उल्लेख केल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र किसान मोर्चाचे उपाध्यक्ष नितीन उदमले यांनी खोचक भाष्य केले आहे. लोखंडे हे रोज सात किलोमीटर मुंबईत चालण्याऐवजी शिर्डी मतदारसंघात चालले असते तर आज मतदारसंघात असलेली एवढी नाराजी दिसली नसती आणि दहा वर्षे खासदार राहिल्यानंतरही उमेदवारीसाठी झगडावे लागले नसते, असं खोचक भाष्य उदमले यांनी केले आहे.
नितीन उदमले हे महाराष्ट्र किसान मोर्चाचे उपाध्यक्ष आहेत. खासदार लोखंडे यांच्यावर असलेल्या एकूणच नाराजीच्या चर्चेमुळे शिर्डीची जागा भारतीय जनता पक्षाकडे जाणार असल्याचे बोललं जात असून आणि महाराष्ट्र किसान मोर्चाच्या उपाध्यक्षपदी असलेले नितीन उदमले यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची मोठी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर खासदार लोखंडे यांनी केलेल्या वक्तव्यावर नितीन उदमले यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी खा.लोखंडे यांच्यावर निशाणा साधत शिर्डी मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून आपलीच दावेदारी असणार त्या दृष्टीने आपणही स्पर्धेत असल्याचे संकेत दिले आहेत.