माजी आ.भाऊसाहेब कांबळे यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश..
उद्धव ठाकरे गटाला धक्का!!
शिर्डीची लढत दोन भाऊसाहेबांत होणार??
नगर:
माजी आमदार आणि शिवसेना ठाकरे गटात असलेले भाऊसाहेब कांबळे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. गुरुवारी मुंबईमध्ये भाऊसाहेब कांबळे यांनी नजीकच्या कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते कांबळे यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. भाऊसाहेब कांबळे श्रीरामपूरचे दोनदा आमदार राहिले असून त्यांनी शिर्डी लोकसभा निवडणूकही लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता.
काँग्रेस सोडून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेतील फुटी नंतर ते उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहिले. नुकतेच उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी मतदार संघात झालेल्या शिव संपर्क यात्रेत भाऊसाहेब कांबळे उद्धव ठाकरे यांच्या सोबतच व्यासपीठावर दिसून आले. नुकतेच शिर्डीत झालेल्या युवा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातही त्यांनी उपस्थिती लावली होती.
मात्र आता त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघातून एकनाथ शिंदे शिवसेना गटाकडून अद्याप उमेदवार घोषित झालेला नाही. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या बद्दल तीव्र नाराजी असल्याचे बोललं जातेय. त्यामुळे शिर्डीची जागा बहुधा भारतीय जनता पक्ष किंवा मनसे यांच्याकडे जाऊ शकते. त्याचबरोबर आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही शिर्डी मधून उमेदवारी मागितलेली आहे.
या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब कांबळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने शिर्डी मधून एकनाथ शिंदे शिर्डीची जागा आपल्याकडेच ठेवत भाऊसाहेब कांबळे यांना उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे संभाव्य उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात मैदानात उतरवणार का यावर चर्चा सुरू झाली आहे.