नगर:
जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेला देश अशी भारताची ओळख आहे. 17 व्या लोकसभेची मुदत आता संपत असताना आज शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी 18 व्या लोकसभे साठी निवडणुकांची घोषणा केली आहे. 18 व्या लोकसभेसाठी देशभरात एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यात महाराष्ट्रामध्ये एकूण पाच टप्प्यांमध्ये 48 लोकसभा मतदारसंघासाठी तारखा आज घोषित करण्यात आल्या.
जिल्ह्यात अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी या दोन लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे आज एकीकडे निवडणुकांच्या तारखा घोषित होऊन आचारसंहिता लागलेली असताना नगर दक्षिण आणि शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांन प्रचारासाठी किती दिवस मिळणार याची आकडेमोड सुरू झाली आहे.
आज 16 मार्च रोजी आचारसंहिता घोषित झाले असल्याने मार्च महिन्यामध्ये 16 दिवस एप्रिल महिन्याचे 30 दिवस तर मे महिन्यामध्ये 11 मे पर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. एकूण पाहिले तर 57 दिवस अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रचार करू शकतील. 13 मे रोजी मतदान असल्याने जवळपास 48 तास अगोदर म्हणजे 11 मे रोजी सायंकाळपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येईल.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात केवळ भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची उमेदवारी अधिकृतपणे घोषित झालेली आहे. महाविकास आघाडीत नगर दक्षिणेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोण उमेदवार असेल याची उत्सुकता आता ताणलेली असेल अर्थात पारनेरचे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात असलेले आमदार निलेश लंके यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश रेंगाळलेला आहे. यामध्ये काही तांत्रिक कारण असल्याची चर्चा आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये याबाबत मार्ग काढण्यात येणार असून त्यानंतर आमदार निलेश लंके हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून महाविकास आघाडीचे उमेदवार असणार असल्याचं जवळपास नक्की झाल्याचं बोललं जात आहे.
दुसरीकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे शिवसेनेकडून माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी अंतिम मानली जात आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अनौपचारिकपणे तशी घोषणाही केलेली आहे. महायुतीमध्ये ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असून या ठिकाणी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे आहेत. सदाशिव लोखंडे यांच्या बद्दल मतदार संघात नाराजी असल्याची मोठी चर्चा आहे. त्यामुळे शिर्डीची जागा भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे घेतल्याची घेतल्याचे बोलले जाते. तसेच झाल्यास भारतीय जनता पक्ष कोणाला उमेदवारी देणार याचीही मोठी उत्सुकता आहे. भाजपच्या महाराष्ट्र किसान मोर्चाचे उपाध्यक्ष आणि माजी सनदी अधिकारी नितीन उदमले यांचे नाव भारतीय जनता पक्षाकडून पुढे येऊ शकते अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याचबरोबर आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही शिर्डीच्या जागेवर दावा केला असून शिर्डीतील पदाधिकाऱ्यांनी आठवले यांना महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष उमेदवार उभा केला जाईल असा इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर एकीकडे निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू करत निवडणुकांच्या तारखा घोषित केलेल्या असल्या तरी अहमदनगर दक्षिणेत महाविकास आघाडीचा तर शिर्डी मध्ये महायुतीचा उमेदवार कोण यावर सध्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. प्रचारासाठी जवळपास 57 दिवस मिळणार असल्याने आता अधिकृत उमेदवारी घोषित झालेले एकमेव उमेदवार सुजय विखे हे आपल्या प्रचाराचा धडाका सुरू करतील असे चिन्ह आहे.