सारडा महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा..
नगर:
पेमराज सारडा महाविद्यालयात विद्यार्थिनी व महिला प्राध्यापकांसाठी अनोख्या कार्यक्रमांचे आयोजन करून महिला दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयात सायंकाळी एका शानदार सोहळ्याचे आयोजन केले होते. यामध्ये विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्यातील कलागुणांचे सादरीकरण केले. यामध्ये नृत्य, गायन, चित्रपट गाणे ओळखा स्पर्धा, कोडे स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी रॅम वॉक हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. यात भारतीय व वेस्टर्न परंपरेचे पोशाख परिधान केलेल्या विद्यार्थिनींची पावले रॅम वॉकवर थीरकली. कायम अभ्यासाच्या टेन्शन खाली असलेल्या विद्यार्थिनी या कार्यक्रमात मनमोकळ्या पणे सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमांना उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापकांनी दाद दिली. रॅम वॉकमध्ये महाविद्यालयातील महिला प्रध्यापही उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचा मोह आवरला नाही. विद्यार्थिनीं बरोबर प्राध्यापकांनीही यावेळी आंनद घेतला. सारडा महाविद्यालयात प्रथमच आशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी कार्यक्रमाचे उद्घाटन हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक व महाविद्यालयाचे चेअरमन सुमतीलाल कोठारी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित, उपप्राचार्य मंगला भोसले, प्रबंधक अशोक असेरी यांच्यासह सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
यावेळी शिरीष मोडक म्हणाले, महिला दिन हा महिला व मुलींचा हक्काचा दिवस असतो. आज सर्व क्षेत्रांवर महिला आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत. दरवर्षी लागणाऱ्या परीक्षांच्या निकालांमध्ये कायमच मुलीच अव्वल असतात. त्यामुळे आज सर्व क्षेत्रांमध्ये मुली आघाडीवर आहेत. सारडा महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी आज कला, क्रीडा, सांस्कृतिक व शासकीय स्तरावरील क्षेत्रात उच्च पदस्थ झाल्या आहेत.
सुमतीलाल कोठारी म्हणाले, आजच्या बदलत्या युगात महिलांना खूप महत्त्व आले आहे. सारडा महाविद्यालयातही सर्व महत्त्वाच्या पदांवर महिलाच काम करत असल्याने महाविद्यालयात महिलाराज आहे. प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होत महिला एक एक क्षेत्र पादाक्रांत करत आहेत. याचा अभिमान आम्हाला आहे.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रसाद बेडेकर यांनी केले, प्रा अतुल कुलकर्णी यांनी आभार मानले.