नगर:
अहमदनगर उत्तरचे भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील यांनी संगमनेरचे भाजप तालुका अध्यक्ष वैभव लांडगे यांना पदावरून निलंबित केले होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व तालुक्याची कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती. मात्र काल 6 मार्च रोजी सुचने नुसार अचानक तालुकाध्यक्ष लांडगे यांना निलंबित करत आणि संपूर्ण कार्यकारीणी बरखास्त करण्यात आल्यानंतर अवघ्या 24 तासांत वैभव लांडगे यांना उत्तर जिल्हाध्यक्ष लंघे यांनी पत्र देत दिलेला आदेश पुढील निर्णय होई पर्यंत स्थगित केल्याचे स्पष्ट केले आहे.
एकूणच एकीकडे जर जिल्हाध्यक्ष लंघे यांनी निर्णय घेतला तरी हा निर्णय अवघ्या 24 तासांत फिरवला गेल्याने आणि यासाठी माजी पालकमंत्री आ.राम शिंदे आणि माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड यांनी वरिष्ठ पातळीवर पुढाकार घेतल्याने जिल्ह्यातील भाजप मधील सूनदोपसुंदी समोर आली आहे असे बोलले जात आहे.
वैभव लांडगे हे संघटनेचे जुने निष्ठावान कार्यकर्ते आहेत. संघटनेच्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्याचा प्रयत्न हा सातत्याने होत आहे. याबाबत माजी पालकमंत्री आ प्रा राम शिंदे व माजी जिल्हाध्यक्ष प्रा भानुदास बेरड यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचे लक्ष वेधले असल्याचे समजत आहे. त्यानुसार प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी जिल्हाध्यक्षांनी दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली असल्याचे सांगण्यात आले आहे.
संगमनेर तालुक्यात भाजपंतर्गत नवा-जुना वाद गेल्या काही महिन्यांपासून असून तीन महिन्यांपूर्वी कार्यकरणीत बदल करण्यात आले होते. पक्षनिष्ठा की व्यक्तीनिष्ठा असा तिढा सुरू झाल्याने त्यात पक्ष संघटनेचे नुकसान होत असल्याचे काहींचे म्हणणे आहे.

