दिल्ली:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर निवेदन करताना संसदेला तसेच देशाला उद्देशून केलेले भाषण म्हणजे उंबरठ्यावर असलेल्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल असल्याचे मानण्यात येत आहे. पंतप्रधान म्हणून दोन टर्म पूर्ण केल्यानंतर तिसऱ्या टर्म साठी निवडणुकीला भाजप मित्रपक्षांच्या एनडीए आघाडीसह सामोरी जाण्यास भाजप सज्ज असल्याचे मोदींनी आपल्या संसदीय निवेदनात नेहमीच्या “डंके की चोट” पर अविर्भावात स्पष्ट केले.
यातील साहजिकच दोन टर्म मध्ये केलेल्या विविध कामांची जंत्री मांडतानाच मोदींनी विरोधी पक्ष खास करून काँग्रेस पक्षाला टार्गेट करत निवेदन केले. मात्र यामध्ये मोदींकडून कधीकाळी काँग्रेसवर केला जाणारा परिवारवाद अर्थात घराणेशाही वर होणारा आरोप विरोधकांकडून “बुमरॅगं” होत असल्याने मोदींनी तो पलटवून टाकताना एकाच कुटुंबातील अनेकांनी राजकारणात येणे चुकीचे नाही, नवे चेहरे तरुण चेहरे राजकारणात यायला हवे अशी आमचीही भूमिका असल्याचे मोदींनी निक्षूण सांगितले. एखाद्या कुटुंबात आपल्या क्षमतेच्या जोरावर आणि लोकांच्या पाठिंब्यावर कोणी राजकारणात प्रगती करत असेल तर त्याला आम्ही कधीच घराणेशाही मानत नाही, मात्र जो पक्ष एकच कुटुंब चालवतो, त्या पक्षाचे सर्व निर्णयही एका कुटुंबातून चालवले जातात त्याला आम्ही घराणेशाही म्हणतो, असं महत्त्वपूर्ण विश्लेषण घराणेशाहीवर मोदी यांनी केले आहे.
एकूणच भारतीय जनता पक्षातही अनेक कुटुंबात स्थानिक पातळीवर परिवारवाद वा घराणेशाहीचा ठपका दिसून येतो आणि त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एकाच कुटुंबात दोन व्यक्तींना उमेदवारी मिळेल का? अशा शंका पक्षातीलच काही नेतेमंडळी उठवीत होते अशी चर्चा असताना, मात्र एकूणच मोदींनी काल संसदेत घराणेशाहीवर केलेली भाजपाची नवीन व्याख्या पाहता राजकारणात परंपरागत पद्धतीने अनेक वर्ष असलेल्या कुटुंबांना आता दिलासा मिळणार आहे.
नगर जिल्ह्यातही अनेक राजकीय कुटुंबात परंपरेने घरातीलच चेहरे पुढे राजकारणात आलेले दिसून येतात. असे चेहरे सर्वच पक्षांमध्ये असले तरी सध्या येणारी लोकसभा निवडणूक पाहता एकीकडे राज्याच्या मंत्रिमंडळात राधाकृष्ण विखे मंत्री पदावर असताना त्यांचे पुत्र खासदार सुजय विखे यांना भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा उमेदवारी मिळेल का अशी शंका विरोधकांसह खुद्द भारतीय जनता पक्षातीलच अनेक राजकीय नेते मंडळी आणि त्यांचे कार्यकर्ते चर्चा करताना खाजगीतून दिसून येत होते. कोणी लॉबिंग आणि शिफारशी करून उपयोग नाही अशीही वक्तव्ये येत होती. मात्र आता कुठेतरी मोदी यांनीच भारतीय जनता पक्षामध्ये एकूणच राजकीय परिस्थितीचा आढावा घेतलेला दिसून येतोय आणि लोकसभेत जर भारतीय जनता पक्षाला 370 पेक्षा किंवा एनडीएला 400 पेक्षा अधिक जागा जिंकायचे असतील तर अनेक ठिकाणी विद्यमान असलेल्या आणि सक्षम असलेल्या उमेदवारांना पुन्हा उमेदवारी द्यावी लागणार अशी परिस्थिती आहे. त्यामुळे घराणेशाही आणि एकाच कुटुंबात एकालाच पद असे करून चालणार नाही. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत गांधी घराण्यातील परिवारवाद आणि घराणेशाही वर विरोध करत टीका केली असली तरी काँग्रेस आणि भाजपमधील परिवारवाद यामध्ये स्वतंत्र विश्लेषण करत आमच्या पक्षांमध्ये नवीन आणि जनतेचा पाठिंबा असलेल्या नव्या पिढीला उमेदवारी देणे म्हणजे हा परिवा वाद नसल्याचे आता स्पष्ट केले आहे.
काय म्हणाले होते पंतप्रधान..
-एकाच कुटुंबातील अनेकांनी राजकारणात येणं चुकीचं नाही. नवे चेहरे, तरुण चेहरे राजकारणात यायला हवेत अशी आमचीही भूमिका आहे. एखादं कुटुंब आपल्या क्षमतेच्या जोरावर, लोकांच्या पाठिंब्यावर राजकारणात प्रगती करत असेल तर त्याला आम्ही त्याला कधीच घराणेशाही म्हणत नाही. पण जो पक्ष एक कुटुंब चालवतो. त्या पक्षाचे सर्व निर्णयही एका कुटुंबाकडून चालवले जातात, त्याला आम्ही घराणेशाही म्हणतो. एखाद्या कुटुंबातील दोन सदस्य प्रगती करत असतील तर मी त्यांचं स्वागत करेन. दहा जणांनीदेखील प्रगती केली तरी मी त्यांचं स्वागत करेन. नव्या पिढीचं स्वागत करणं योग्य आहे
-पंतप्रधान नरेंद्र मोदी