राष्ट्रवादीचे अनेक शिलेदार फोडत संस्थाही घेतल्या ताब्यात!!
नगर:
2019 च्या विधानसभेतील भाजपचे तत्कालीन कॅबिनेट तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांचा पराभव भाजपला मोठा धक्का होता. नवख्या रोहित पवारांनी आपल्या विविध कामातून जादू दाखवत तरुणाईवर एक भुरळ पाडत मोठ्या आशा निर्माण केल्या आणि त्यात सलग दोन वेळा आमदार राहिलेल्या तर अनेक टर्म सदाशिव लोखंडेच्या निमित्ताने भाजपकडेच असलेल्या मतदारसंघात सत्तांतर केले. राम शिंदे यांच्यासाठी 2019 चा पराभव जिव्हारी लागणारा होता. कारण अनेक भाजपचे त्यांचे सहकारी त्यांना सोडून रोहित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी पक्षात गेले. अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायती मधली भाजप कडे असलेली सत्ता गेली. राम शिंदेंची त्यावेळी झालेली पीछेहाट त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असली तरी शिंदेंनी कच न खाता राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असल्याने त्या माध्यमातून एकट्याने किल्ला लढवत आपले राजकीय वजन कायम ठेवले.
दरम्यान पक्षाने त्यांना विधान परिषदेवर घेत मोठे बळ दिले आणि त्यानंतर आ.राम शिंदेंनी कर्जत आणि जामखेड तालुक्यातील पक्षातून बाहेर गेलेले मोहरे परत आपल्याकडे फिरवण्यास सुरुवात केली. त्यात दरम्यानच्या काळात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका असोत की बाजार समित्यांच्या निवडणुकां असोत कर्जत, जामखेड तालुक्यात बेरजेचे राजकारण करत राष्ट्रवादी पक्षातीलच बिनीच्या नेत्यांना आपल्या गळाला लावले आणि या संस्थांत सत्ता आपल्याकडे खेचून आणली.
खर्डा, पिंपळवाडी, तळवडी, सिद्धटेक सारख्या मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीत पदाधिकारी आपल्याकडे घेतल्या. पवनराजे राळेभात सारखे अनेक स्थानिक वजन असलेल्या नेत्यांनी आ.राम शिंदे यांच्या नेतृत्वातील आता काम करण्यास सुरुवात केली असून त्यांना भाजप मध्ये महत्वाची पदे देत त्यांचा सन्मान सुरू केला आहे. आ.शिंदे यांचे तसेही मतदारसंघात दोन्ही तालुक्यात कार्यकर्त्यांचे जाळे होते. मात्र 2019 ला मिळालेल्या पराभवा नंतर अनेक कार्यकर्ते आ.रोहित पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडले गेले होते. यातील अनेक कार्यकर्ते आता पुन्हा राम शिंदे यांच्याकडे परतत असल्याने त्यांची राजकीय ताकत पुनर्स्थापित होत असल्याचे चित्र आहे.
मतदारसंघात प्रतिष्ठेचा झालेला प्रस्तावित कर्जत एमआयडीसीचा मुद्दा मध्यंतरी प्रचंड गाजला. आ.रोहित पवारांनी विधानसभा अधिवेशनात यात मोठा आवाज उठवत वादळ निर्माण केले. मात्र प्रस्तावित एमआयडीसीच्या जागेवरच आ.राम शिंदे यांनी लक्ष वेधत यात काही वादग्रस्त नावांचा उल्लेख करत प्रश्नचिन्ह निर्माण केले. तसेच स्थानिक ग्रामस्थांचा पाठिंबा आपल्याबाजूला वळवला. राज्यात सत्तेत असल्याचा मोठा फायदा त्यांना यानिमित्ताने झाला आणि कर्जत एमआयडीसीच रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला. आता नव्याने नव्या जागेत एमआयडीसी होणार आहे. एकूणच या राजकीय डावपेचांच्या राजकारणात आ.राम शिंदे यांनी आपल्या राजकीय विरोधकांवर मात देण्यात यश मिळवले.
आता लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. अशात आ.राम शिंदे यांनी लोकसभेसाठी इच्छुक आहेत. त्याच बरोबर लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकाही काही महिन्यांत होणार आहेत. त्यामुळे या येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूका पाहता आ.शिंदे यांनी दोन्ही ठिकाणी आपली “फिल्डिंग” पक्ष पातळीवर आणि प्रत्येक्ष ग्राउंडवर लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एकीकडे भाजचेच विद्यमान खा.सुजय विखे तर दुसरीकडे विधानसभा मतदारसंघातील राजकीय विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.रोहित पवार यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे. त्यात आ.रोहित पवार सध्या ईडीच्या फेऱ्यात अडकले असल्याचा फायदा आ.राम शिंदे आपसूक उठवत असून आपला हक्काचा कर्जत-जामखेड मतदारसंघ मजबूत करत आहेत.