नगर:
पक्ष, पक्षाची विचारधारा, पक्षविचारांचा स्वाभिमान, पक्ष एकनिष्ठता यावर वर्षानुवर्षे एखाद्या पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे नेते-कार्यकर्ते ही त्या-त्या राजकीय पक्षांची खरी संपत्ती आणि ओळख होती. मोडेल पण वाकणार नाही.. हा बाणा असलेली अनेक दिग्गजांची नावे सहज आठवले तरी समोर येतील. काँग्रेस,कम्युनिस्ट असो वा भाजप असो या पक्षात असलेली नेते-कार्यकर्ते मंडळींचा पक्षाची विचारधारा जोपासत अत: ते अंत असा आयुष्याचा प्रवास असलेला काळ आता संपत चाललाय असे चित्र आहे. आता रात्री एका पक्षात असलेला नेता सकाळी दुसऱ्या कोणत्या पक्षात असेल याचा नेम राहिलेला नाही. गल्ली ते दिल्ली असे देशातच हे चित्र आता आपण पाहत आहोत. याच निमित्ताने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एकट्या नगर जिल्ह्यातील नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पक्षांच्या घोषित झालेले उमेदवारांच्या नावावर नजर मारली आणि या उमेदवारांचा राजकीय पूर्वतिहास तपासला तर किमान तीन पक्षात फिरून नव्या पक्षात वा मागे सोडलेल्या पक्षात पुनरप्रवेश केल्याचे दिसून येईल. याबाबत अगदी थोडक्यात नजर मारली तरी चारही उमेदवार विविध पक्षात स्थलांतर करत प्राप्त परिस्थितीत स्थिरावले आहेत. अर्थातभविष्यात यातील ही नेते मंडळी सध्या आहे तिथेच असतील की अजून कोठे हे सांगण्याचे धाडस मोठ्यातला मोठा राजकीय विश्लेषक अन ज्योतिषीही करणार नाही!!
गंमतीचा भाग म्हणजे पक्ष सोडे पर्यंत गळा सुके पर्यंत असलेल्या पक्षाचे तोंडभरून कौतुक, पक्षनेतृत्वाचे तोंडातून पाणी टपके पर्यंत गुणगान सुरू असले तरी नव्या पक्षात पक्षांतर करताच जुना पक्ष,पक्षाची कार्यपद्धती, पक्ष नेतृत्वाने केलेला कथित अन्याय याची लाखोली मोठमोठ्या आवाजात केली जाते. आश्चर्याचा भाग म्हणजे नेत्यांचे हे “स्थलांतरित पक्ष्यांतर” आता जनतेच्या अंगवळणी पडलेले आहे. त्यामुळे आता जनताही असल्या गोष्टी गंभीरपणे घेत नाही. वास्तविक लोकशाहीत पक्षविचारधारा ही मोठी शिदोरी मानली जाते. पक्ष विचारधारेवर जनमत तयार केले जाते आणि रुजवले जाते. मात्र नेते मंडळींनी सध्या जनतेला गृहीत धरले आहे. आपण जो काही निर्णय घेत जुन्या पक्षाला तिलांजली देऊन नव्या पक्षात जाऊ तेथे आपल्याला मानणारी जनता आपल्या दावणीला बांधलेली असेल याचा विश्वासच नव्हे तर खात्री असल्यागत नेते क्षणात निर्णय घेत असतात. अर्थात निवडणुकांना लोकशाहीत मोठा उत्सव समजले जाते. निवडणूक विभाग जास्तीतजास्त मतदारांना या लोकशाहीच्या उत्सवात मतदान करून सहभागी होण्यासाठी आटापिटा करतो. मात्र या लोकशाहीच्या उत्सवातील “पक्षांतरित उत्सवमूर्तीं” बाबत मतदारराजा किती उत्साहित असेल हा प्रश्न तसा वादातीत म्हणून सोडून द्यावा लागेल.. एव्हढंच!!
1)सुजय विखे/राधाकृष्ण विखे: काँग्रेस-शिवसेना-भाजप
2)निलेश लंके: शिवसेना-राष्ट्रवादी-राष्ट्रवादी अजित पवार गट-राष्ट्रवादी शरद पवार गट
3)सदाशिव लोखंडे: भाजप-मनसे-शिवसेना-शिवसेना शिंदे गट
4)भाऊसाहेब वाकचौरे: शिवसेना-भाजप-शिवसेना ठाकरे गट