तेंव्हा नाही मग आज का..पैगंबर जयंती मिरवणूकीतील आपल्या फ्लेक्सवर सुजय विखे स्पष्टच बोलले..
अहिल्यानगर(राजेंद्र त्रिमुखे):
2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी डॉ. सुजय विखे यांची एक अर्थाने राजकीय पटलावर एन्ट्री झाली. वास्तविक त्यावर्षी नेहमीप्रमाणे अगोदर लोकसभेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी राधाकृष्ण विखे आणि डॉ.सुजय विखे तत्कालीन एकत्रित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून इच्छुक होते. नगर दक्षिणेची जागा आघाडीत राष्ट्रवादी कडे असल्याने तेंव्हा काँग्रेस मध्ये असलेले राधाकृष्ण विखे यांनी डॉ.सुजय यांच्यासाठी राष्ट्रवादी अर्थात शरद पवार यांच्याशी असलेले राजकीय वैर बाजूला ठेवत उमेदवारी साठी खूप प्रयत्न केले. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेल्या पवारांनी विखेंना अनेक दिवस खेळवत ठेवले मात्र अखेर उमेदवारी काही दिली नाही, आणि राष्ट्रवादी पक्षाची उमेदवारी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या पदरात पडली. प्राप्त परिस्थितीत विखे परिवाराने धाडसी निर्णय घेत अगोदर डॉ. सुजय विखे यांना भाजपात धाडले. भाजपालाही यानिमित्ताने एक तगडा उमेदवार मिळाला कारण राधाकृष्ण विखे काँग्रेसचे आघाडीकडून विरोधी पक्ष नेते असले तरी त्यांची मोठी जवळीक देवेंद्र फडणवीस यांच्याशी होतीच. 2019 ची लोकसभा निवडणूक संग्राम जगताप विरुद्ध सुजय विखे अशी तगडी झाली, यात शरद पवारांमुळे जगताप यांचे पारडे जड मानले गेले खरे मात्र राधाकृष्ण विखे यांनी जीवतोडुन लावलेली ताकतीने डॉ सुजय विखे यांनी संग्राम जगताप यांचा पराभव केलाच.
उत्तरेतून दक्षिण नगर जिल्ह्यात येत भाजप खासदार होण्याचा मान मिळवला असल्याने 2024 साली सुजय विखे पुन्हा आरामात निवडून येतील अशी परिस्थिती होती. जोडीला 2019 ला लोकसभेला विरोधक असलेले आ. संग्राम जगताप बदलत्या राजकीय परिस्थितीत महायुतीत सत्तेत आल्याने जोडीला होते. संग्राम जगताप यांचे स्व.माजी आ. अरुणकाका जगताप यांच्या पासून मुस्लिम समाजात चांगले संबंध होते. त्यामुळे भाजप, आ. जगताप आणि जोडीला मुस्लिम मतांच्या जोरावर शहरातून सुजय विखे मतांची आघाडी घेतली असे निर्विवाद बोलले जात होते.
प्रत्येक्षात लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात युपीए कडून तर राज्यात आघाडी कडून “अब की बार चारसौ पार” च्या भाजपच्या नेत्यांच्या वक्तव्याचा आधार घेत भाजप संविधानात बदल करणार असा जोरदार प्रचार करण्यात आला. या प्रचाराचा परिणाम असा झाला की मुस्लिम समाजाने सरसकट आपली मते काँग्रेस-राष्ट्रवादी च्या उमेदवारांकडे वळवली. नगर शहराचा विचार करता मुस्लिम बहुल भागातील मतदानाची आकडेवारी पहिली तर राष्ट्रवादीचे निलेश लंके यांना मुस्लिम बहुल भागातून आघाडी मिळाल्याचे दिसून आले. एकंदरीत याचा परिणाम असा झाला की सुजय विखे यांचा जवळपास 30 हजार मतांनी धक्कादायक पराभव झाला. या पराभवा मागे मुस्लिम मते तुटल्याचे केवळ सुजय विखे यांनाच नव्हे तर आ. संग्राम जगताप यांच्याही लक्षात आले. आ. जगतापांची त्यानंतर मुस्लिम समाजाबद्दल बदललेली भूमिका हे त्याचेच द्योतक असल्याचे बोलले जाते.
विखेंच्या 2019 ला विजय तर 2024 ला पराभव याचा मोठा अनुभव विखे,जगताप यांनी घेतला असला आणि यात केवळ पारनेर पुरते मर्यादित असलेले निलेश लंके जिल्ह्याच्या
राजकारणाच्या पटलावर आल्याने तेंव्हा पासून खा.लंके विरुद्ध माजी खा.सुजय विखे यांच्यातील खडाकडी नित्यनियमाचा भाग बनला आहे.
विखेंच्या खासदारकीची काळात नगर मनमाड महामार्ग वगळता इतर दिशेने जाणारे बहुतांशी राष्ट्रीय महामार्ग पूर्णत्वास गेले तर शहरातील वीस वर्षे रखडलेला उड्डाणपूल पूर्ण झाला. शहरातील उड्डाणपुलाच्या पूर्णत्वाच्या निमित्ताने विखे-जगताप जवळही आले. मात्र 2024 च्या सुजय यांच्या पराभवानंतर विकासाला कुठेतरी खीळ बसली असे बोलले जाऊ लागले आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे डबल इंजिन सरकार आहे. त्यामुळे खासदार असूनही पुरेसा निधी विकासकामांना मिळतो का यावर खापर फोडले जात असताना खुद्द पारनेर तालुक्यातच राणी लंके यांचा विधानसभेला झालेला पराभवही खा. लंकेंनाही राजकीय धडा देऊन गेला आहे, त्यामुळे “गड्या आपला विधानसभा मतदारसंघच बरा!!” अशीच त्यांचीही भूमिका त्यांच्याच वक्तव्यातून आधोरेखीत झाली. “कुणाची तरी जिरवायची होती म्हणून.. ” या भूमिकेमुळे लंके हे 2029 ला लोकसभेला नव्हे तर विधानसभेच्या आखड्यातच दिसतील अशी अटकळ अनेकांची आहे.
या पार्श्वभूमीवर लंकेंना मतदान करून आणि विजयात हातभार लावून आपल्या पदरात काय पडले याचा विचार मुस्लिम समाजातूनही सुरू असल्याचे बोलले जाते. त्यामुळे समाजाने विकासाची दृष्टी असलेल्या, केंद्रात वजन असलेल्या आणि अल्पसंख्याक समाजाबद्दल मवाळ भूमिका घेत आलेल्या सुजय विखेंचा पुनर्विचार सुरु केला असल्याचे दिसून येत आहे. याचाच प्रत्येय नगरसेवक नज्जू पैलवान यांच्या माध्यम मुलाखतीत तसेच महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या झेंडा मिरवणूक मार्गावर दिसून आला. माजी खा. सुजय विखे यांचे छायाचित्र असलेले फलक मिरवणुकीत दिसून आले. नगर शहर असो वा लोकसभा असो विखे परिवारातील सदस्यांने निवडणूक लढवावी समाज साथ देईल असाच काहीसा संदेश काहीजण देत असले आणि त्यामुळे मोठी चर्चा झडत असली तरी सुजय विखे यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे.
लोकसभा निवडणुकीत एका विशिष्ट समाजाने आपणाला नाकारले. तेव्हा कोणी विचारायला मला आले नाही, असे सांगून आता समर्थन देत असेल तर ते त्यांनाच विचारा, असे स्पष्टीकरण माजी खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे. अहिल्यानगरमध्ये लावण्यात आलेल्या फलकाबाबत गुरुवारी त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीतील सर्व घटक पक्ष जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागत आहेत. आपण जात-धर्म विरहित विकासाचे राजकारण करतो हे सांगण्यास मात्र सुजय विखे विसरले नाहीत. मात्र अशा पद्धतीने विपर्यास करणे चुकीचे आहे. काहीही झाले की मलाच वादात का ओढता असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. लोकसभेला एका विशिष्ट समाजाने नाकारले. तेव्हा त्यांना विचारायला कोणी गेले नाही आणि आपल्यालाही कोणी विचारायला आले नाही.आता कोणी समर्थन देत असेल तर त्यांना फलक लावावा वाटले असेल. ते त्यांना विचारले पाहिजे अशी भूमिका मांडत सुजय यांनी थेट उत्तर न देता चेंडू मुस्लिम समाजाच्या कोर्टात परतवून लावला.
या प्रक्रियेशी आपला काहीही संबंध नाही. अहिल्यानगरच्या विकासासाठीचे काम करण्यावर आपला भर आहे. त्यामुळे प्रत्येक विषयाचा वाद निर्माण करून विपर्यास करणे चुकीचे आहे.कोणत्याही प्रक्रियेशी संबंध नाही. नाकारले तेव्हाही दुःख झाले नाही आणि आता कोणी स्वीकारत असेल तर त्याचा आनंद नाही. अशी भूमिका आज तरी सुजय विखे यांची आहे. मुळात लोकसभा किंवा विधानसभेला दोन-अडीच वर्षांचा मोठा कालावधी आहे. तो पर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून जाणार असल्याने राजकारणात मुरब्बी असलेला विखे परिवार आज मितीला सावध भूमिकेत दिसणार आहे. मात्र आतापर्यंत कधीही थेट भडकाऊ वक्तव्ये न केलेल्या विखे यांच्या कडून हार-जित मध्ये महत्वाची मते बाळगून असलेल्या मुस्लिम समाजाबाबत भविष्यातील त्यांची वक्तव्ये, भुमीका, विकासाची कामे यातून पाणी कुठे मुरतेय का हे राजकीय विश्लेषकांना समजावून घ्यावे लागेल हे निश्चित.

