नगर(राजेंद्र त्रिमुखे):
– राज्यातील विधानसभेचा बिगुल वाजल्यानंतर नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातील राजकीय हालचालींना वेग वाढला आहे. यात नगर शहर मतदारसंघ आणि त्याचबरोबर शिर्डी मतदार संघ वगळता इतर दहा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीला यश मिळेल असं बोललं जात आहे आणि त्यामुळे साहजिकच महायुतीसाठी एक मोठी धोक्याची घंटा असताना नगर शहरातील महायुती साठी ‘सेफ’ समजल्या जागेसाठी कोतकरांच्या संभाव्य उमेदवारीवरून जगताप वर्तुळ “सावध” झाले आहे.
केडगावकरांच्या भूमिकेबद्दल मविआ मध्ये उत्सुकता!!
-दुसरीकडे केडगावकर काय भूमिका घेतात, त्यांना मविआतुन उमेदवारी मिळेल का याची महाविकास आघाडीत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या एकंदरीत परिस्थिती पाहता सलग दोन वेळेस विधानसभेवर निवडून गेलेले आमदार संग्राम जगताप यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून जवळपास अंतिम झालेली आहे.
जगतापांसमोर मविआ तोकडी!!
–इकडे महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांची यादी पाहता आमदार संग्राम जगताप यांना तोडीसतोड “फाईट” देणारा नेता महाविकास आघाडीकडे आहे का याबद्दल मुंबईत वरिष्ठ पातळीवर खल सुरू आहे. लोकसभेत निलेश लंके यांना यश मिळाले. यात नगर शहरातून २०१९ ची सुजय विखेंना लोकसभेला मिळालेली आघाडी २०२४ला राखता आलेली नाही. त्या मागे नगर शहरात मविआची संघटित ताकत एकत्र आल्याने हे चित्र होते. मात्र लोकसभेच्या निकाला नंतर नगर शहरातील संघटित ताकत मविआ टिकवून आहे का? तर याचे उत्तर नाही असेच म्हणावे लागेल. कारण मविआतील तीनही पक्षाचे स्थानिक नेते उमेदवारी साठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले असल्याने एकमेकांपासून दूर गेल्याचे चित्र आहे. किरण काळे थोरातांच्या भरवशावर, कळमकर मोठ्या साहेबांच्या आशेवर तर शिवसेनेतील इच्छुक ठाकरेंच्या भरवशावर आपल्याच उमेदवारी मिळेल या आशेवर आहेत. एकत्रित तयारी नाही, जागा कुणाला सुटणार याची निश्चितता अद्याप नाही, त्यात कोतकरांच्या नावाने एन्ट्री झाल्याने मविआ मध्ये सध्या अदृश्य सन्नाटा आहे.
शहरातील मविआ नेते एकसंघ होणार का??
-आ.जगतापां एव्हढे शहर,उपनगरात प्रबळ संघटन एकत्रित मविआ कडेही नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकत नगण्य, तर किंग्रेसच्या स्थानिक नेत्यांत एकी नाही तर बेकी आहे. त्या मानाने शिवसेना उबाठा पक्षाची ताकत मोठी असली तरी नेते एकदिलाने उमेदवारी मान्य करतील का असाही प्रश्न आहे. कारण इच्छुकांची संख्या मोठी आहे. या अवस्थेत खा.निलेश लंके यांच्या आशीर्वादावर इच्छुक निवडणूक लढवू पाहत आहेत. मात्र शहरातील मविआच्या एकंदरीत परिस्थितीवर राज्य नेतृत्व लक्ष ठेवून असल्यानेच कोतकरांचा पर्याय समोर आला असल्याची चर्चा आहे.
उमेदवारी वरून सचिन कोतकरांची भूमिका सध्या सावध!!
-कोतकरांच्या तांत्रिक अर्थात न्यायालयीन अडचणी हा एक मोठा अडथळा आहे. त्याबाबत मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच सुवर्णा कोतकर यांचा पर्यायही राखून ठेवला गेला आहे. तसेच गंभीर स्वरूपाचे हे प्रकरण असल्याने एकीकडे प्रयत्न सुरू असले तरी “साहेबां”चा ग्रीन सिग्नल अजून मिळालेला नाही अशी माहिती आहे. या परिस्थितीत केडगावकरांनी दंड थोपटले असले तरी त्यात थेट स्पष्टता नाही. गुरुवारी सचिन(आबा)कोतकरांनी पत्रकार परिषद घेतली खरी पण चाणाक्ष पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना त्यांनी थेट उत्तर न देता वेट अँड वॉच अशीच भूमिका घेतली. निवडणुकी साठी आम्ही तयार आहोत, मविआतुन शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बोलनीचे प्रयत्न सुरू आहेत, वेळ आली तर अपक्ष लढू हे सांगतानाच “भाऊ” आणि “दादा” अंतिम निर्णय घेऊन भूमिका स्पष्ट करतील असेच पालुपद सचिन कोतकरांनी लावले. त्यामुळे निवडणूक लढवायची पण एकूणच भूमिका अजूनही तळ्यात की मळ्यात अशी असल्याने अनेक प्रश्नां बद्दल ते स्पष्टीकरण देऊ शकले नाही. आपली पत्रकार परिषद “ऑडिओ क्लिप” बाबत असून निवडणुकी संदर्भात प्रश्न विचारूच नका अशी सावध भूमिका सचिन आबा कोतकरांनी यावेळी घेतल्याचे दिसून आले. मात्र पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार सुरू ठेवल्याने त्यांनी निवडणूक लढवण्याचे आणि त्यासाठी मविआ मधून तुतारी हाती घेण्यासाठी बोलणी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मविआ’ची जागा कोणत्या पक्षाच्या पदरात पडणार!!
-वास्तविक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढल्यास आणि महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी घोषित उमेदवाराला साथ दिल्यास संग्राम जगताप यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहू शकते मात्र, एकंदरीत नगर शहरातील उमेदवारी बाबत महाविकास आघाडीत मोठा संभ्रम असून तीनही पक्षांमध्ये आपल्याच पक्षाला आणि आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी चढाओढ सुरू आहे. यादरम्यान माजी महापौर संदीप कोतकर यांच्या समर्थकांनी संदीप कोतकर यांच्या उमेदवारीसाठी सुरू केलेले प्रयत्न पाहता आणि एकंदरी त्यांचा ओढा महाविकास आघाडीकडे असल्याचे दिसून येत असताना याबाबत जगताप वर्तुळ सावध झाले असून काटेकोर नियोजनाचा आराखडा करत कुठल्याही परिस्थितीत बेसावध न राहता विजयाची हॅट्रिक साधायचीच अशी रणनीती आखत आहे.
जनसंपर्क आणि कामांच्या धडाक्यावर आ. संग्राम जगताप निर्धास्त!!
-आ. संग्राम जगताप यांचे २०१४ आणि २०१९ असे दोनही विजय हे मोदी लाट असताना झाले असल्याने नेहमीच त्यांच्या संघटन कौशल्याचे आणि सततच्या जनसंपर्काच्याचे फलित असल्याचे राजकीय विश्लेषकही मान्य करतात. २०१९ च्या दुसऱ्या टर्म मध्ये शेवटच्या काळात आ.जगताप यांनी अजित पवार गटात जाण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्या एक परिपक्व आणि अभ्यासू राजकारणाचा भाग मानला जात आहे. विखे,थोरातां प्रमाणेच नगर शहरात संग्राम जगताप हाच आमचा पक्ष या भावनेतून शेकडो युवा कार्यकर्त्यांचा संच त्यांच्या सोबत आहे. तर गेल्या दहा वर्षात जमेल तेव्हढा विकासकामांसाठी त्यांनी निधी आणताना शेवटच्या टप्यात तब्बल दीडशे कोटींचा निधी अजितदादांच्या माध्यमातून पदरात पाडून मास्टरस्ट्रोक खेळला आहे. शहरातील विविध समाजाशी त्यांनी सातत्याने संपर्क ठेवला आहे. तर नुकतेच विधांपरिषदेवर इद्रिस नाईकवाडी यांची अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून विधानपरिषदेवर वर्णी लावली गेली असल्याने नगर शहरातील अल्पसंख्याक मुस्लिम समाजाने पेढे वाटत आनंद साजरा केला आहे.
अनेक निवडणुकांचा अनुभव ही जगतापांची जमेची बाजू.. पण कोटकरांच्या नावाच्या चर्चेने जगताप वर्तुळ झाले सावध!!
-एकूणच अशा अनेक जमेच्या बाजू, विकासकामांची मोठी जंत्री सोबत असताना २०२४ ची विधानसभा निवडणूक त्यांना सोपी मानली जात आहे. मात्र म्हाविकास आघाडीकडून वा अपक्ष म्हणून संदीप कोतकर यांच्या समोर त्यांना लढावे लागल्यास ही निवडणूक जगताप यांना हलक्यात घेऊन चालणार नाही. अर्थात वडील माजी आमदार अरूण काका जगताप यांच्या माध्यमातून मिळालेले राजकीय बाळकडू, नगरसेवक, दोनदा महापौर आणि दोनदा आमदार असा राजकीय प्रवास आणि अनुभव संग्राम जगताप यांच्या पाठीशी असल्याने ती एक मोठी जमेची बाजू त्यांना असल्याचे दिसून येत आहे.
मविआ’तील इच्छुक वेट अँड वॉचच्या पावित्यात!!
-येणाऱ्या आठवडा भरात होणाऱ्या घडामोडी मोठ्या रंजक असणार असून नगर शहराची निवडणूक धुरळा उडवत राज्यात लक्षवेधी ठरू शकणार आहे ती कोतकर यांच्या उमेदवारीच्या चर्चेने. कोतकरांच्या एन्ट्रीने मविआ मधील इच्छुकांच्या नावांवरील चर्चा काहिशी थांबल्याचे चित्र आहे. याबाबत अनेक इच्छुक वेट अँड वॉचची भूमिका घेत माध्यमात कसलीही प्रतिक्रिया देण्याचे टाळत आहेत. वरिष्ठ पातळीवरून काय तो निर्णय येऊ द्या, त्यानंतरच भूमिका स्पष्ट करू असे सांगण्यात येत आहे. या बाबत एका दुसऱ्या पक्षाच्या इच्छुक नेत्याने पवार साहेब गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन मिळेल असा निर्णय घेणार नाहीत अशी सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अहिल्यानगरांत खमंग चर्चा..
-एकूणच नगर शहरात सध्या चौकाचौकात, चहाच्या टपरीवर, विविध राजकीय पक्ष कार्यालयात नागरिकांत नगर शहरातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने विद्यमान आमदार संग्राम जगतापांच्या समोर कुणाचे आव्हान असणार? कोतकर कुटुंबाला महाविकास आघाडीची दारे खुली होणार का? असे झाल्यास मविआ मधील इच्छुकांची काय भूमिका राहणार? महाविकास आघाडीतुन उमेदवारी न मिळाल्यास कोतकर अपक्ष म्हणून ताकत अजमावणार का? या दरम्यान माजी आमदार शिवाजीराव कर्डीलेंची भूमिका कशी असणार? अशा एक ना अनेक प्रश्नांवर चर्चा सुरू असताना मोठे औच्छूक्य निर्माण झाले आहे.