नगर: सोमवारी नाशिक दौर्यावर असलेले शिवसेना(उबाठा गट) खा.संजय राऊत (sanjay Raut) यांनी नगर जिल्ह्यात शिर्डीला येत साई दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत लोणी खुर्दच्या सरपंच प्रभावती घोगरे (Prabhavati Ghogare Loni) यांची उपस्थिती, घोगरे यांच्या निवासस्थानी भेट बऱ्याच गोष्टी सांगणाऱ्या ठरल्या असून येणाऱ्या विधानसभेत राहाता-शिर्डीत राजकीय भुंकपाची नांदी देणाऱ्या आहेत. खा.संजय राऊत यांच्याकडे येणाऱ्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांची नाशिक, अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. आक्रमक वृत्ती आणि सडेतोड भाष्य यासाठी प्रसिद्ध असलेले संजय राऊत त्यादृष्टीने कामाला लागल्याचे त्यांच्या शिर्डी दौऱ्याच्या निमित्ताने स्पष्ट झाले. कारण राऊतांनी यानिमित्ताने अनेक नव्या राजकीय समिकरणांचे सूतोवाच केलेय.
विखें समोर प्रभावती घोगरेंना चाल!!
-राहाता-शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा विखे परिवाराचा बालेकिल्ला समजला जातो. राधाकृष्ण विखे हेच आमचे नेते आणि विखे हाच आमचा पक्ष असे मानणारे असंख्य कार्यकर्त्यांचे जाळे विखे परिवाराने गेली कित्येक वर्षांपासून जपून ठेवले आहे. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना, भाजप असा राजकीय प्रवास राधाकृष्ण विखे यांनी करतानाच प्रत्येक निवडणूक लीलया जिंकलीय हा इतिहास आहे. मतदारसंघात कधी कोल्हार, राहत्यातून त्यांना आव्हान उभे राहिले, मात्र प्रत्येक निवडणुकांत बाहेर वातावरण काही असले तरी निवडणुकीच्या निकालानंतर जनता विखे यांच्याच मागे उभी असल्याचे दिसून आले. आता 2024 विधानसभे साठी लोणी खुर्दच्या महिला सरपंच प्रभावती घोगरे यांना चर्चेत आणून संजय राऊत यांनी वादळ निर्माण करण्याची तयारी केल्याचे दिसून येत आहे. राहाता तालुक्यातील श्री गणेश साखर कारखान्याच्या प्रचारसभेत प्रभावती घोगरे यांचे भाषण चांगलेच चर्चेत आले. समाजमाध्यमातून या भाषणाने मोठी धूम उडून दिली. विखेंच्या कट्टर विरोधक असलेल्या घोगरे परिवारानेही आता निवडणुकीची तयारी केल्याचे बोलले जात असून संजय राऊत यांनी त्यांच्या निवासस्थानी दिलेली भेट विखेंना सूचक इशारा देणारी मानली जात आहे. प्रभावती घोगरे यांचे नाव चर्चेत आणून विखे विरुद्ध संजय राऊत असा टीका-टिपण्णीचा सामना अजूनच रंगतदार होणार हे निश्चित.
नगर दक्षिणेत इतिहासाची पुनरावृत्ती!!
-संजय राऊत यांनी शिर्डी भेटीच्या निमित्ताने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघावरही दावा सांगण्याचा प्रयत्न केला. माजीमंत्री नेवाशाचे आ.शंकरराव गडाख यासाठी योग्य उमेदवार असल्याचे त्यांनी सांगतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दुखऱ्या नसे वर बोट ठेवले. नगर दक्षिणेतून आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस लढत आलेली आहे. मात्र राष्ट्रवादीत पडलेल्या उभ्या फुटीनंतर एकूणच जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकत बऱ्याच अंशी कमी झाल्याचे चित्र आहे. राहुरी, कर्जत-जामखेड, पाथर्डी, श्रीगोंदा वगळता नगर लोकसभा या सह विधानसभेसाठी नगर शहर, अकोले, कोपरगाव, पारनेर या जागांवर पक्षाचा ठोस उमेदवार कोण? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. अशात शिवसेनेच्या संजय राऊत यांनी यातील जागांवर दाव्याची तयारी सुरू केल्याचे शिर्डी दौऱ्यातून दिसून येत आहे.
शरद पवार दावा सोडणार नाहीत:
-राष्ट्रवादी शरद पवार गटाने लोकसभेसाठी नगर दक्षिणेतून आ.रोहित पवार, आ.प्राजक्त तनपुरे यांची नावे चर्चेत आणली असली तरी आ.निलेश लंकेच्या भूमिकेवर बरेच काही राष्ट्रवादीचे “डीपेंड” असल्याचीच शक्यता आहे. अशात लंके ऐनवेळी काय भूमिका घेतात हे अनिश्चित असल्याने ही परस्थिती नजरेसमोर ठेवत संजय राऊत यांनी आ. शंकरराव गडाखांचा “ठोस” पर्याय म्हणून चाचपणी केल्याचे दिसून येत आहे. मात्र पवार साहेबांचे नगर दक्षिण जागेवर विशेष प्रेम असून त्यामुळे 2019 च्या विखेंकडून झालेला पराभवाचा वचपा काढण्याची तयारी राष्ट्रवादी कडून असणार आहे. अशात उमेदवार कोण यापेक्षा तो राष्ट्रवादी पक्षाकडूनच कडून लढणारा आणि निवडून येणारा हाच निकष पवार साहेबांचा असणार आहे. मात्र आ.गडाख शिवसेनेत असल्याने राऊत यांचे आडाखे चालणार का हा प्रश्न आहे.
विधानसभेसाठीही राऊतांची रणनीती!!
-विधानसभे साठीही संजय राऊत यांचा प्रयत्न दिसून येणार आहे. नगर शहर, पारनेर, कोपरगाव या मतदारसंघात शिवसेनेने अनेक वर्षे वर्चस्व ठेवले होते. मात्र 2014 पासून याला घरघर लागली. 2019 मध्ये तर एकही आमदार जिल्ह्यातून निवडून आला नाही. निकालानंतर आ.शंकरराव गडाख यांनी हातावर शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला आणि उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्रीही झाले. आता शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्यानंतर राजकीय गणिते पूर्णपणे बदलून गेली आहेत. या बदललेल्या राजकीय परिस्थितीत संजय राऊत यांची नजर नगर शहर, पारनेर, राहाता, कोपरगाव आदी मतदारसंघावर असणार आहे. त्यादृष्टीने राऊत यांनी प्रयत्न सुरू केल्याचे त्यांच्या शिर्डी दौऱ्याच्या निमित्ताने दिसून येत आहे.